Mumbai Real Estate : मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटला अनेकदा 'संथ पण खात्रीशीर' मानले जाते. मात्र, एका मालमत्तेने ग्रह चुकीचा ठरवला आहे. दिग्गज गुंतवणूकदार आणि मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष रामदेव अग्रवाल यांच्या एका जुन्या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. वरळीतील त्यांच्या 'समुद्र महल' मधील फ्लॅटच्या किमतीत झालेली वाढ गुंतवणुकीच्या जगात चर्चेचा विषय ठरली आहे.
१२५ रुपयांचा चौरस फूट आता १.२५ लाखांवर!
रामदेव अग्रवाल यांच्या माहितीनुसार, वरळीच्या समुद्रकिनारी असलेल्या 'समुद्र महल' इमारतीत १९७५-७६ च्या काळात घराचा दर अवघा १२५ रुपये प्रति चौरस फूट होता. आज याच मालमत्तेचा दर १.२५ लाख रुपये प्रति चौरस फूट इतका झाला आहे.
या फ्लॅटने गेल्या ४० वर्षांत सुमारे १९% परतावा दिला
भारतीय शेअर बाजाराचा दीर्घकालीन सरासरी परतावा १७.५% च्या आसपास राहिला आहे. म्हणजेच, या रिअल इस्टेट गुंतवणुकीने 'दलाल स्ट्रीट'लाही धोबीपछाड दिली आहे.
पाच दशकांचा वारसा
१९७३ मध्ये बांधलेली 'समुद्र महल' ही इमारत ५० वर्षे जुनी असून ती मुंबईतील लक्झरी लाइफस्टाइलचे प्रतीक मानली जाते. ही मालमत्ता एकेकाळी ग्वाल्हेरच्या शाही घराण्याची होती. आज येथे देशातील अनेक दिग्गज उद्योगपतींचे वास्तव्य आहे. रामदेव अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाने २०२१ मध्ये १७ व्या आणि १८ व्या मजल्यावरील हा ड्युप्लेक्स फ्लॅट सुमारे ४६.२९ कोटी रुपयांना खरेदी केला होता.
वाचा - स्वतःचे घर की भाड्याचे बिऱ्हाड? RBI च्या दरकपातीनंतर 'घर खरेदी' फायद्याची की तोट्याची? पाहा गणित
गुंतवणूकदारांसाठी धडा
ही गोष्ट केवळ एका फ्लॅटची नसून ती 'प्राइम लोकेशन' आणि 'दीर्घकालीन गुंतवणुकीच्या' ताकदीची आहे. मुंबईसारख्या शहरात समुद्रकिनारी किंवा मोक्याच्या ठिकाणी केलेली गुंतवणूक कधीही वाया जात नाही. मालमत्ता असो वा शेअर्स, संपत्ती निर्माण करण्यासाठी संयम अत्यंत आवश्यक आहे. योग्य वेळी घेतलेला निर्णय गुंतवणूक 'मल्टीबॅगर' कशी करू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
